Saturday, May 17, 2008

प्रकाश क्षीरसागर यांना कवी बी पुरस्कार प्रदान


चाळीसागव ः येथे झालेल्या अंकुर साहित्य संघातर्फे येथे झालेल्या चाळीसाव्या अंकुर राज्य मराठी साहित्य संमेलनात दै. "गोमन्तक'चे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना त्यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहासाठी प्राप्त झालेला "कवी बी पुरस्कार' प्रदान करताना संमेलनाध्यक्ष प्रा. जवाहर मुथा व सकाळ न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कांबळे व इतर. प्रकाश क्षीरसागर यांना कवी बी पुरस्कार प्रदान पणजी, ता. १७ ः चाळीसगाव (जि. जळगाव) येथे अलीकडेच झालेल्या अंकुर साहित्य संघाच्या राज्य मराठी साहित्य संमेलनात दै. "गोमन्तक'चे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना "कवी बी पुरस्कार' प्रदान करण्यात आला. साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. जवाहर मुथा व सकाळ न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कांबळे यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. यावेळी अंकुर साहित्य संघाचे संस्थापक, कार्याध्यक्ष हिंमत शेकोकार इतर पदाधिकारी तुळशीदास बोबडे, डॉ. प्रमोद काकडे, साहेबराव मोरे, जिजाबाराव जाधव, स्थानिक आमदार व्यासपीठावर होते. संमेलनात दुपारी झालेल्या "कवितेची हानी कशी व कोणामुळे' या विषयावरील परिसंवादात श्री. क्षीरसागर सहभागी झाले होते. नवोदित कवी अनुकरण करतात. काही वेळा प्रथितयश कवींच्या कविता स्वतःच्या नावावर खपवितात, त्यांचे वाचन कमी असते, खान्देशात बहिणाबाई चौधरी यांच्यासारखा अष्टाक्षरी छंदात लिहिणाऱ्या कवयित्रीची साधी, सोपी व सरळ कविता अभ्यासली जात नाही आदि कारणांमुळे कवितेचा दर्जा घसरत आहे. कवितेच्या हानीला हे घटक मुख्यत्वे कारणीभूत आहेत, असे मत त्यांनी या परिसंवादात व्यक्त केले.

Sunday, April 27, 2008

सौ. चित्रा क्षीरसागर यांच्या कविता

सासुरवासीण
लेक चालली सासरी
उभी राहे दारी
विवाहाचे तप झाले
दाटतेच उरी
डोळे पुसते का?
त्या विरहाच्या
यातानाऊरी
भावनांचा पूर
पाठवणी करताना
बाप घरामध्ये माझा
डोळे टिपतो लपून
कष्ट केले संसारात
जपतो अजून
खंतावते कधी पोर
दूर किती राहे
हात सदा पाठीवर फिराताहे

दिंड्या
पंढरीच्या वाटेवर
दिंड्या चालल्या कितिक
वारकरी भजनात
झाडे झेलतात दुःख
बाभळीची झाडे वेडी
सडा फुलांचा घालती
वाटे पिवळी धमक
पायघडी अंथरती
देण्या सावली भक्तांना
बाभळही पुढे सरे
गच्च पानांच्या फांद्यांत
कडुनिंब छत्री

-- सौ. चित्रा क्षीरसागर

अंकुर साहित्य पुरस्कार

प्रकाश क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे' कवितासंग्रहाला
अंकुर साहित्य पुरस्कार
पणजी, ता. 27 ः अकोला येथील "अंकुर साहित्य संघा'तर्फे देण्यात येणारा 2007 चा "कवी बी पुरस्कार' (महाराष्ट्र वगळून) दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील आहेत. अंकुर साहित्य संघातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात येतात. संघातर्फे 10 व 11 मे रोजी चाळीसगाव येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. श्री. क्षीरसागर यांचा या आधी "गर्भावल्या संध्याकाळी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला असून महाराष्ट्रातील विविध साहित्यविषयक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटनेचा वेणेगुरकर स्मृती पुरस्कारही त्यांना यापूर्वी मिळाला आहे. तसेच संवाद नाशिक व गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीचे कविता व कथालेखनाची पारितोषिके व मराठी विज्ञान परिषदेचा विज्ञानरंजन कथेचे पारितोषिक मिळाले आहे. ते गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी कार्यकारिणी सदस्य, ताळगाव मराठी संस्कार केंद्राचे उपाध्यक्ष, कविकुल साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

Tuesday, March 25, 2008

बालकथा 2 -- हावरट कावळा

बालकथा 2


हावरट कावळा


आमच्या घराशेजारच्या झाडावर एक कावळा रोज येत असे. त्याच्याबरोबर दुसराही कावळा येऊ लागला. दोघे भाऊ भाऊ होते त्यामुळे एकत्र राहत होते. एकत्र उडत होते. खात-पीत होते. एक कावळा मेहनती होता. दुसरा आळशी व हावरट होता. एका माणसाने जवळच्या पिंपळाच्या झाडावरील ढोलीत पानांचे द्रोण तयार करून त्यात काही धान्य साठवून ठेवले होते. ते या हावरट कावळ्याने पाहिले. तो माणूस निघून जाताच तो पिंपळाच्या ढोलीकडे गेला. द्रोणातील सर्व धान्य त्याने खाऊन टाकले. काही वेळाने येऊन पाहतो तो काय, धान्य गायब. त्याला काही कळेचना काय झाले ते. बिच्चारा निराश झाला.
हे पाहून चिडलेल्या माणसाने आणखी काही दिवसांनी ढोलीत आणखी अन्न, फळे व फुले आणून ठेवली. त्यातील अन्न या कावळ्याने खाल्ले. पुन्हा त्या माणसाने येऊन पाहिले तर त्याला पानाच्या द्रोणात फक्त फुलेच दिसली. अन्न दिसलेच नाही. त्या झाडाखाली एक मुलगा बसला होता. त्या मुलाला माणसाने विचारले, अरे बाळा, या ढोलीत मी दोनदा अन्न, फळे व फुले ठेवली होती. ती फळे खाल्लीस काय? मी नाही हो काका खाल्ली फळे, हे बघा, असे म्हणून त्याने तोंड उघडून दाखवले, हे बघा माझ्या तोंडात अन्नाचा कणही नाही. मी तर काही खाल्लेच नाही. हावरट कावळ्याची करणी त्याने पाहिली होती. पण काका, कोणी खाल्ली ते मला माहीत आहे, असे म्हणून त्याने कावळ्याचे कृत्य त्याला सांगितले. तो माणूस म्हणाला, अरेच्या असे आहे काय? त्या कावळ्याला उद्या बघतो. त्या माणसाने दुसऱ्या दिवशी पुन्हा ढोलीत द्रोण ठेवून त्यात धान्य ठेवले. तो झाडावर लपून बसला. हावरट कावळा तेथे आला. त्याने द्रोणावर झडप घालताच त्या माणसाने त्याच्या टाळक्‍यात काठी हाणली. हावरटपणामुळे कावळा मेला.


तात्पर्य ः हावरटपणा कधीही करू नये.


- राघव प्रकाश क्षीरसागर,
इयत्ता दुसरी
मुष्टिफंड महालक्ष्मी विद्यालय, पणजी.

बालकथा --- दुष्टाचा अंत

बालकथा
1)
दुष्टाचा अंत

एका गावाबाहेर घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भला मोठा तलाव होता. त्या तलावात अनेक जलचर राहत होते. त्याचप्रमाणे काठावर असलेल्या झाडांवर माकडं, वानरं, खारी असले प्राणी राहत. ससे, हरिण, वाघ असे प्राणी होतेचे. सगळे आपापल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने राहात होते.
त्या तळ्यात एक मगर राहायची. ती स्वभावाने खूप दुष्ट होती. त्या मगरीचे वागणे कुणालाच आवडत नसे. ती कुणाशी मैत्री करीत नव्हती. तिचे नेहमी सगळ्यांशी खटके उडत. त्या जंगलातील झाडावर चिंटू नावाचा माकड राहात होता. त्याचा स्वभाव मगरीच्या अगदी उलट. अगदी प्रेमळ, मनमिळावू. सगळ्यांशी त्याची गट्टी जमे. तो हुशाही होता. मगरीचे वागणे त्याला आवडत नसे. तो तिला परोपरीने समजून सांगत असे. अग बाई असे दुष्टपणान वागू नको, त्याचा परिणाम भलताच होईल. पण तिच्या कानी कपाळी ओरडून काय फायदा, तिला त्याचे म्हणणे कधी पटतच नसे. ती सांगून ऐकत नसे.
त्याला नेहमी वाटायचे तिने चांगले वागावे. पण नाही. उलट ती त्यालाच सतावत असे. एकदा त्याला वाटले की तिला चांगला धडा शिकवायला पाहिजे. काय करावे, असा विचार तो करू लागला. विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली.
एके दिवशी काय झाले. चिंटू झाडावर उड्या मारत खेळत होता. तेवढ्यात मगर तळ्याच्या काठावर आली. त्याला म्हणाली, ""चिंटू चिंटू मी येऊ का तुझ्याबरोबर खेळायला.'' तिच्या डोळ्यातील कावा त्याला समजला. चिंटू सावध होताच. तो म्हणाला, ""ये की कोण नको म्हणतंय.'' त्याचा होकार मिळताच तिने विचारले काय खेळायचे? त्यावर चिंटू म्हणाला, ""आपण लपाछपी खेळू या.'' असं करता करता मगरीवर राज्य आलं. तेव्हा तिने विचार केला, त्याला शोधून काढण्याच्या बहाण्याने त्याला आपण मारून खाऊ शकू. ती त्याला शोधायला निघाली. पण चिंटू हुशार तो झाडावर जाऊन लपला. तिने खूप हुडकूनही तो तिला दिसेना. तेव्हा हार मानून तिने त्याला हाक मारली. पण चिंटूने ओऽऽ दिलीच नाही. तो आपला आंबे खात बसला होता वर. तिने त्याला पाहून न पाहिल्यासारखे केले. आता तिने थकून जाऊन बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. कारण तिला चिंटूला खायचे होते. आपण बेशुद्ध पडल्याचे पाहून तरी तो खाली येईल, अशी तिला खात्री होती. चिंटूला वाटले, की मगर खरोखर बेशुद्ध पडली आहे. तो खाली येऊ लागला. तेवढ्यात मगरीने डोळे किलकिले
केले ते त्याच्या लक्षात आले. आपल्याला खाऊन टाकण्याचा तिचा डाव आहे, हे त्याच्या ध्यानात आले. तो परत वर गेला व दुसऱ्या झाडावर जाऊन तिच्या पाठीमागून खाली उतरला. तिच्या ते लक्षात आलेच नाही. तिला वाटले तो खाली येत आहेच. पण चिंटून खाली जाऊन चांगले दहा बारा मोठे धोंडे आणले. चिंटू येत नाही हे पाहून मगर कंटाळली आता ती उठली व निघाली तडातडा झाडाकडे. तेवढ्यात चिंटूने एका मागून एक मोठमोठे धोंडे नेम धरून तिच्या अंगावर फेकले. वरून दगड पडल्याने तिच्या डोक्‍याला मार लागला. खूप जोरात लागल्याने मगर मरून गेली. दुष्ट मगर मेल्यामुळे सगळ्या जंगलाचे संकट दूर झाले. सर्वांनी चिंटूचे आभार मानले.
काय दोस्तांनो आवडली ना माझी गोष्ट!

माधव प्रकाश क्षीरसागर,
इयत्ता सहावी
मुष्टीफंड महालक्ष्मी विद्यालय, पणजी

Thursday, March 13, 2008

माझे काव्यधन


वास्तवाचे कटुत्व
आयुष्याच्या विस्कटलेपणावर वैतागलेली ती
घरातील कानाकोपरा आवरावा तशी मनाला आवरते
कोनड्यात अस्ताव्यस्त कपडे
सगळीकडे मुलांनी पसरलेली पुस्तके
कागदाचे कपडे आवरता आवरता नाकी नऊ येतातच,
तशीच ती मनाच्या कानाकोपऱ्यातील कचरा आवरते
पुन्हा पुन्हा आणि वैतागतेही
पुन्हा पुन्हा एक कोपरा आवरून झाला की पुन्हा दुसरा
असे सतत सुरूच असते
तिचे आवरणे आणि मुलांचे पुन्हा केर कचरा करणे
तद्वतच मनातील सुप्त आशा इच्छा आकांक्षांचो कोनाडे
ती आवरतेच आहे, कित्येक दशके
मनांचा पसारा, मनाचा आवारा
कोणतीच गोष्ट व्यवस्थित राहत नाही,
तेव्हा ती कातावते पुन्हा पुन्हा दोष देते स्वतःलाच
आयुष्य म्हणजे तडजोड
हे तिला ठावून असूनही तिचे वैतागणे सुरूच दशकानुदशके,
मागे वळून पाहताना ती दचकते क्षणभर,
कुठे आहे? कुठे आहे, ते स्वप्नांचे आयुष्य?
एकच भोवती सत्य वास्तवाचे कटुत्व!

- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर,
ताळगाव, गोवा

प्रकाश क्षीरसागर यांच्या कवितासंग्रहाचे सोमवारी प्रकाशन

पणजी, ता. 13, सांस्कृतिक प्रतिनिधी - दै. "गोमन्तक'चे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाचे प्रकाशन गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे सोमवार 17 मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मंडळाच्या सभागृहात होणार आहे. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुरेश स. नाईक असतील. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. लेखक, समीक्षक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी या काव्यसंग्रहावर भाष्य करतील. श्री. क्षीरसागर यांचा यापूर्वी "गर्भावल्या संध्याकाळी' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील विविध दैनिके, नियतकालिके व दिवाळी अंकातून त्यांच्या कविता सातत्याने प्रसिद्ध होत असतात. महाराष्ट्रातील विविध संस्थांच्या तसेच गोमंतक मराठी अकादमीच्या स्पर्धेत त्यांच्या कवितांना पुरस्कार मिळाले आहेत.