Thursday, March 13, 2008

माझे काव्यधन


वास्तवाचे कटुत्व
आयुष्याच्या विस्कटलेपणावर वैतागलेली ती
घरातील कानाकोपरा आवरावा तशी मनाला आवरते
कोनड्यात अस्ताव्यस्त कपडे
सगळीकडे मुलांनी पसरलेली पुस्तके
कागदाचे कपडे आवरता आवरता नाकी नऊ येतातच,
तशीच ती मनाच्या कानाकोपऱ्यातील कचरा आवरते
पुन्हा पुन्हा आणि वैतागतेही
पुन्हा पुन्हा एक कोपरा आवरून झाला की पुन्हा दुसरा
असे सतत सुरूच असते
तिचे आवरणे आणि मुलांचे पुन्हा केर कचरा करणे
तद्वतच मनातील सुप्त आशा इच्छा आकांक्षांचो कोनाडे
ती आवरतेच आहे, कित्येक दशके
मनांचा पसारा, मनाचा आवारा
कोणतीच गोष्ट व्यवस्थित राहत नाही,
तेव्हा ती कातावते पुन्हा पुन्हा दोष देते स्वतःलाच
आयुष्य म्हणजे तडजोड
हे तिला ठावून असूनही तिचे वैतागणे सुरूच दशकानुदशके,
मागे वळून पाहताना ती दचकते क्षणभर,
कुठे आहे? कुठे आहे, ते स्वप्नांचे आयुष्य?
एकच भोवती सत्य वास्तवाचे कटुत्व!

- प्रकाश रामचंद्र क्षीरसागर,
ताळगाव, गोवा

प्रकाश क्षीरसागर यांच्या कवितासंग्रहाचे सोमवारी प्रकाशन

पणजी, ता. 13, सांस्कृतिक प्रतिनिधी - दै. "गोमन्तक'चे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाचे प्रकाशन गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे सोमवार 17 मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मंडळाच्या सभागृहात होणार आहे. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुरेश स. नाईक असतील. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल. लेखक, समीक्षक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी या काव्यसंग्रहावर भाष्य करतील. श्री. क्षीरसागर यांचा यापूर्वी "गर्भावल्या संध्याकाळी' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील विविध दैनिके, नियतकालिके व दिवाळी अंकातून त्यांच्या कविता सातत्याने प्रसिद्ध होत असतात. महाराष्ट्रातील विविध संस्थांच्या तसेच गोमंतक मराठी अकादमीच्या स्पर्धेत त्यांच्या कवितांना पुरस्कार मिळाले आहेत.