Sunday, May 17, 2020

गझल - दु:ख साचले


कुणा कुणास सांगते मनात दु:ख साचले
नयन मूक बोलले उरात दु:ख साचले

फुलात कोवळा तुरा किती दिमाख दावतो
कुठे कळे फळासही तळात दु:ख साचले


मनूस हाव बघ सुटे उगाच भुईस खोदतो
झरे मुकाट थांबता जलात दु:ख साचले

वधू नवीन घरी रमे पतीस प्रेम देतसे
सखीस आठवू कशी क्षणात दु:ख साचले


सतावते रात्र ही मनात याद दाटते
मनास जाच होत अन् तनात दु:ख साचले

#. सागर प्रकाश
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर


Monday, May 11, 2020

गझल



कारुण्य आज माझ्या हृदयात साठलेले 
अश्रू रुपात सारे डोळ्यांत दाटलेले


चुकवून जात मीही दिसता मवाली
पण नेमके मला ते धरण्यास धावलेले


घेतो शिवून ओठा अन्याय सोसताना
अन् हुंदके उरीचे कण्हण्यास भावलेले


सगळी बनेल दुनिया भोळा म्हणून फसतो
तेथे किती शिकारी  लुटण्यास थांबलेले

समजून वाग 'सागर' येथील माणसांशी
मोहात गुंतवोनी जगण्यास बांधलेले



#. सागर प्रकाश
काव्यास्वाद – लिहिणाऱ्या हातांचा उत्सव 
काव्यास्वाद 
माधव राघव प्रकाशन ताळगाव, गोवा  यासंस्थेतर्फे  ‘काव्यास्वाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये एका कवी/कवयित्रीची कविता/गझल अथवा मुक्तछंदातील रचना घेऊन त्या रचनेचे  रसास्वादात्मक रसग्रहण करण्याचा उपक्रम सुरू आहे. गझलकार, पत्रकार व साहित्यिक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर तसेच कवयित्री चित्रा क्षीरसागर हे रसग्रहण करणार आहेत. या सदरात कवीचा अल्पपरिचय, प्रकाशित पुस्तके समाविष्ट करण्यात येतो.
आजच्या सर्जनशील कवयित्री आहेत, नागपूर येथील प्रा. मीनल सुरेश येवले. 
प्रा. सौ. मीनल सुरेश येवले 
एम. ए. बी. एड. एम. फिल (मराठी)
ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय कुही जि. नागपूर येथे अध्यापन (कनिष्ठ व्याख्याता) 
प्रकाशित पुस्तके 
कवितासंग्रह 
मोहोर (२००७), परिघ (२०१३), मी फूल मातीचे (२०१७), वेदनेला फुटे पान्हा(२०१९)
ललितलेखसंग्रह आंदण (२०१७), एकांताचे कंगोरे (२०१९), कवितेच्या पाऊलवाटा (प्रकाशनाच्या वाटेवर) अनेक साहित्य संस्थांचे मानाचे पुरस्कार त्यांच्या कवितासंग्रह व ललितलेख संग्रहांना मिळाले आहेत.  यात प्रामुख्याने विदर्भ साहित्य संघ, स्व. सूर्यकांतादेवी पोटे राज्यस्तरीय पुरस्कार, पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरचा साहित्य पुरस्कार, शिवचरण उजैनकर फाउंडेशनचा तापीपूर्णा साहित्य पुरस्कार अंकुर साहित्य संघाचे साहित्य पुरस्कार तसेच आदर्श टीचर्स असोसिएशनचा शिक्षिका पुरस्कार  त्यांना मिळाला आहे. 
आंदण या ललितसंग्रहातील वसंतवेणा लेख अमरावती विद्यापीठाच्या मृद्गंध भाग -१ या बी. ए. प्रथम वर्षाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट. अनेक दिवाळी अंकातून त्यांच्या कविता व ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या अनेक लेखमाला विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.  नागपूर तरुण भारत आदी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले आहे. आकाशवाणी नागपूरवर त्यांचे कवितावाचन झाले आहे.  

त्यांच्या बऱ्याच कविता कोमल हृदयाचे प्रतीक आहेत. मातीचे मार्दव त्यांच्या कवितेत दिसते. तू येताना ही कवितादेखील अशीच मातृत्वभावनेने ओतप्रोत भरलेली  आहे. या कवितेप्रमाणेच त्यांच्या इतर कविताही मृदू व कोमल भावनेने भारलेल्या व भरलेल्या आहेत. त्यांच्या हृदयातील ही भावना प्रकट करताना त्या मुळीच आक्रस्ताळेपणा करीत नाहीत. शिक्षकी पेशात असल्याने त्यांना इतरांना समजून घेण्याची कला अवगत असेल. 
तू येताना ही कविता अशीच नवविवाहितेच्या जीवनात आई होण्याचा जो महत्त्वपूर्ण क्षण असतो त्याचे वर्णन करणारी आहे. या कवितेत सृजनाचे गाणे ऐकू येते. 

तू येताना....

काळजावरी जेव्हा पडली तुझी चिमणपावले 
त्याच क्षणातून नवसृजनाचे विश्व मला गावले 

दुःख वेचुनी वाटेवरचे हात दिला जगताना 
पदरी माझ्या पुण्य पाडले नको नको म्हणताना 

स्नेह जुळविता पुलाखालुनी किती वाहिले पाणी 
काही ओंजळीत, काही पापणीत त्यांची जुळली गाणी 

मनात अत्तर सोडून जाते, तळहातावर रंग
दरवळ, रुणझुण सभोवताली सुखस्वप्नांचा संग 

जन्मा घालीन,  तुला जोजविन कितीही सोशीन कळा 
शब्दसखी गे लाव मस्तकी अस्तित्वाचा टिळा 

तुझी गोजिरी  साद ऐकण्या ऐलतिरावर उभी 
पैलतिराहून येताना तू लख्ख चांदणे नभी 
प्रा. मीनल येवले नागपूर 
(७७७४००३८७७)

मीनलताई या कवितेतून आपल्या उदरात प्रकट होत असलेल्या नवअर्भकाच्या चाहुलीचे वर्णन करतात.ती हळुवार मृदू मुलायम पावले  ही चिमणपावले प्रत्येक सर्जनशील अशा मातेला सुखावत असतात. ही पावले काळजावर पडली असे त्या म्हणतात. एखाद्या अत्यानंदाच्या क्षणी किंवा अत्यंत विव्हल अवस्थेत काळजाचा ठोका चुकतो म्हणतात, सृजनाचा अनुभव माती असो की माता या दोघींनाही तितक्याच गर्भकळा सोसूनच घ्यावा लागतो. कोंब बाहेर येताना मातीलाही वेदना होतात आणि मातेलाही नवअर्भकाच्या प्रसूतीच्या वेदना सोसाव्या लागतात. या चिमणपावलाच्या चाहुलीने कवयित्रीला नवसृजनाचे  विश्व सापडल्याचा आनंद होत आहे. हाच अनुभव त्यांनी बाई आणि माती या कवितेतूनही शब्दबद्ध केला आहे.दोघींची जातकुळी एकच बाई आणि मातीची असे त्या कवितेत त्यांनी म्हटले आहे. 
हा सृजनाचा आनंद सहजासहजी मिळत नसतो. त्यासाठी कष्ट आणि दुःख दोन्ही झेलावे लागते. कवितेचेही सृजन असेच असते. या ओळीत कवयित्री म्हणते वाटेवरचे दुःख प्रियजनांनी वेचून आपल्याला जगताना हात दिला व सुखाचे जीवन जगण्यास मदत केली.  त्याचवेळी आपल्या पदरात पुण्य आपसूकच पडले अगदी नको नको म्हटले तरीही. 
स्नेह जुळविता पुलाखालुन खूपच पाणी वाहून गेले आहे. सृजनाच्या या प्रवासातला हा अनुभव अत्यंत विलक्षण आहे. हे अनुभाचे पाणी आपण ओंजळीत घेतले तर काही पाण्याची आपल्या पापणीत त्याची गाणीच झाली. हा एका मातेचा आणि कवितेच्या जन्माचा असा समासमा संयोग आहे. 
हे नवअर्भकाच्या जन्माचे स्वप्न सुखद आहे. अगदी प्रसववेदनांच्या कळांची किंमत सोसून बाई किंवा कवी हे सृजन करीत असतो. ही निर्मिती प्रक्रिया कशी असते. आई बनणं किंवा कविता जन्मणं ही प्रक्रियाच मनात अत्तर आणि तळहातावर रंग, दरवळ सोडून जाते. हे होताना सुखस्वप्नाचा संग तिला किवा त्याला सोबत करतो. 
प्रत्येक स्त्रीचं अस्तित्व मातृत्वावर समाज मान्य करतो. अन्यथा वांझ स्त्रीच्या वाट्याला जे दुःख येतं ते अगदी दुस्तर आणि कठीण असतं. समाजाचे टोमणे हे त्या दुःखाहून अधिक प्रखर असतात. त्या आगीत होरपळत तिला जीवन कंठावे लागते. तद्वत नवनिर्मिती करणाऱ्या प्रत्येकाला किंवा प्रत्येकीला मग ती माती असो. ते बीज पोटात घेऊन त्यातून कळा सोसत नव सृजनाचे हे आत्यंतिक वेदना सोसूनही अगदी सुखदपणे करायचं असतं. कवी किंवा कवयित्रीच्या वाट्यालाही हे सुख आणि दुःख येतंच. 
मनाच्या गाभाऱ्यात कविता आणि स्त्रीच्या (मग ती बाई असेल, गाय असेल, लता किंवा वेल असेल अर्थात कोणतीही मादी असेल) गर्भात प्रसवत असते. तरीदेखील त्या संकल्पनेला जन्म देण्याचा सोस प्रत्येकीला वा प्रत्येकाला असतो (अर्थात शब्दाला शब्द किंवा अक्षराला अक्षरे जुळवून कविता करणाऱ्याला त्याची कल्पना येणारच नाही. या कळा कितीही सोसाव्या लागल्या तरी सर्जनाचा किंवा सृजनाचा जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. कवयित्री म्हणते हे शब्दसखी तू जन्माला येऊन माझ्या मस्तकी अस्तित्वाचा टिळा लाव. 
नवसंकल्पना प्रकट झाली की ती कोवळी असते. तिची साद गोजिरी असते. ती ऐकण्यासाठी सर्जनशील मन अगदी आतुर असते. ती ऐलतीरावर उभी राहून कवितेला, नव अर्भकाला साद देते. त्याच वेळी ती संकल्पना, ती कविता किंवा नवसर्जन पैलतीरावरून आपल्या जन्मदात्रीला किंवा जन्मदात्याला प्रतिसाद देते..  हा अनुभव लख्ख चांदण्यासारखा असतो. 
अर्थात प्रत्येकाचा याबाबतीत वेगळा अनुभव, वेगळी भावना व वेगळ्या प्रसवकळा असतील. त्याचा अर्थ जाणवणे हीदेखील एक प्रसव कळा किंवा वेदना असू शकते. त्या भावनेशी आपण एकरूप झालो तरच ती प्रकट होते. त्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ते मातीकडं, मातेकडं आणि भावनेशी एकरूप होणाऱ्याकडं असावं लागतं. 
या कवितेचा अर्थ ताडून पाहताना माझ्या संकल्पना आणि कवयित्रीच्या मनातील कल्पना आणि संवेदना वेगळी असू शकते.  रसिक वाचकहो आपणही या कवितेशी समरस होऊन त्याचा अनुभव घ्या.....

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (९०११०८२२९९) 
ताळगाव, गोवा 
Prakashkshirsagar.blogspot.com वरदेखील या रसग्रहणाचा व माझ्या इतर साहित्याचा अनुभव घ्यावा.

काव्यास्वाद

<काव्यास्वाद - लिहिणाऱ्या हातांचा उत्सव बाईपणाची कहाणी सांगणारी कविता रेखा मिरजकर यांनी स्त्री वेदनेला दिलेलं आभाळ गोव्यातील स्त्रीवादी लेखिकांमध्ये काही नावे ठळकपणे घ्यावी लागतील त्यात रेखा मिरजकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या मांदियाळीत माझ्या माहितीप्रमाणे रेखा ठाकूर, दया मित्रगोत्री, अंजली आमोणकर, चित्रा क्षीरसागर, अंजली चितळे, संगीता अभ्यंकर, कविता बोरकर अशी नावे डोळ्यांसमोर येतात. अर्थात ही वानगीदाखल काही नावे आहेत. रेखा मिरजकर या केवळ कवयित्री नाहीत तर कथालेखन, ललित आणि कादंबरीलेखनातही त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे पाऊलखुणा व पांगारा हे कथासंग्रह, इटुकलं घरं पानाविण चाफा हे ललितलेखसंग्रह तसेच मोठी तिची सावली व जिणे गंगौघाचे पाणी या दोन कादंबऱ्या आणि बोली आरुषाची हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांना गोमंतक मराठी अकादमीचे अनुदान तसेच पाऊलखुणा या संग्रहाला गोमंतक मराठी अकादमीचा साहित्य पुरस्कार आण गोमंत विद्या निकेतनचा पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना लाभले आहेत. संमंध सप्तपदीनंतरच्या प्रवासात तुझ्याबरोबर चालताना अनामिक ऊर्मीनं, माझ्यातून मला वेगळं करून टांगून ठेवलं झाडावर ! तुझ्याबरोबरचा प्रवास तसा सुखकर झाला... अचानक एका अनामिक वळणावर झाडावर टांगलेलं `मी’च संमंध समोर उभं ठाकतं विचारतं मला विसरलीस? दाटून येतो गळा स्मरतात चंद्रगाणी परीकथेत रमणारी ती अनभिषिक्त वेडी राणी समोर उभे संमंध भूत-भविष्य त्याच्या डोळ्यांत मी चेहरा हरवलेली तळ्यात- मळ्यात – तळ्यात मळ्यात...... रेखा मिरजकर विवाहित स्त्रीची कहाणी त्या इथे नमूद करतात. आपलं पूर्वीचं अस्तित्व म्हणजे माहेरची लाडाची मुलगी, तिचे निरागस शैशव, बालपण आणि पौगंडावस्थेतील ती अल्लड मुलगी असे बदल तिच्यात माहेरातच होत असतात. तिला उपवर झाल्याचे पाहून मात्र आईवडील तिला जबाबदारीची जाणीव करून देतात. आपलं अस्तित्व विसरून ती विवाह मंडपात दाखल होते. तिथे तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते. कुमारी आता सौभाग्यवती होऊन कुणाच्या तरी दारात येते. लग्न झाल्यानंतर ती आपल्यातील अल्लडपणा अथवा बालिशपणा विसरण्याचा आटोकाट प्रयत्न करते. जुन्या जमान्यातील ती मुलगी असल्याने आई तिला पदोपदी उपदेश करून संसार म्हणजे काय, तिथे तुझ्या इच्छा, आशा आणि आकांक्षा नेहमीच बाजूला सारून पतीशी एकरूप व्हावे, असा बोध आई-वडील आणि इतर वडीलधारे सतत करत असल्याने ती आपले अस्तित्व विसरू लागते. सप्तपदीबरोबर तिचा नवा जन्मच होतो जणू. सप्तपदीनंतर तिच्या भूमिका बदलतात. ती पत्नी तर झालेली असतेच. हळूहळू ती माता बनते, एकेक नव्या भूमिकांत ती इतकी एकरूप होऊन जाते की. जणू तिनं तिचं अस्तित्व झाडावर टांगून ठेवलेलं असतं. एके दिवशी अचानक तिच्यावरील संसाराच्या जबाबदाऱ्या, मुलाबाळांचे शिक्षण संपते त्यांचे लग्न होऊन ती स्वतःला मोकळ मोकळं समजू लागते. त्याच्याबरोबरच (पती) आतापर्यंतच प्रवास त्याच्या साथीनं आणि त्यानं समजुतीनं आणि तिनंही थोडं झुकवून घेतल्यानं सुखाचा झालेला प्रवास तिला सुखावून जातो. थोड्या प्रौढ झाल्याची जाणीव तिला होते आणि अकस्मात तिच्यातील मी बाहेर डोकावू लागतो. तो तिला मोकळा श्वास घेण्यास खुणावतो. काही बंधनं झुगारण्याचा ती काहीसा प्रयत्न करतेही. तिचा झाडावर टांगलेला मी अकस्मात समोर दत्त म्हणून उभा राहून तिच्या अस्तित्वाची जाणीव तिला करून देऊ पाहतो. तिचं बालपण तिला आठवतं. आपण आपल्या कौमार्यावस्थेत पाहिलेली स्वप्न आणि स्वप्नातील राजकुमार तिच्याभोवती फेर धरू लागतो. तीचा गळा दाटून येतो. आणि तिला आठवतात ती चंद्रताऱ्यांची गाणी. कुठे तरी कथा- कादंबऱ्यांतून वाचलेली वर्णने त्या राजकुमारीचा राजकुमार तिला चंद्रतारे आणून देण्याचे आश्वासन देतो. तिच्या सर्व स्वप्नांना एक मूर्त स्वरूप देण्याचे तो राजकुमार देत असतो. वास्तवात मात्र परिस्थितीचे चटके सोसत आणि सगळ्या स्वप्नांना विसरून तिला स्वप्नरंजन सोडावेच लागते. तिच्या मी पणाचे अहंकाराचे, अभिमानाचे, अस्तित्वाचे संमंध तिनेच झाडावर टांगून टाकलेले असते. संस्काराच्या, आईच्या ममतेच्या शब्दांनी ती विसरलेले व विरलेले असते. तिचा भूतकाळ आठवून देणारे अस्तित्व आणि सुखद भविष्याची पुन्हा स्वप्न यात पुन्हा ती स्वतःचं अस्तित्व हरवून बसते. ती अशा वळणावर येऊन ठेपलेली असते की तिला मागेही फिरता येत नाही की वर्तमान बदलता येत नाही. भविष्य तर कुणाच्याच हातात नसतं. त्यामुळे सर्वांचं मन तळ्यात मळ्यात करतं, हे वास्तव कवयित्री खुबीने वर्णन करते. रेखा मिरजकर यांच्या कथनात कुठलाही आक्रस्ताळेपणा नाही किंवा अगदी मलूल झालेली प्राचीन काळातील स्त्रीही दिसत नाही. ती खंबीर आणि स्वतः निर्णय घेणारी स्त्री बनलेली दिसते. परिस्थितीने तिला कितीतरी चटके दिलेले असतात.ठेच आणि खस्ता खाव्या लागलेल्या असतात. त्यातून ती तावून सुलाखून निघालेली असते. ती काही जुन्या काळातील अन्यायात पिचणारी किंवा पिचलेली मध्यमयुगीन स्त्री नाही. किंवा बंडखोर आणि स्त्री मुक्ती चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे समाजात होत असलेली बदलती परिस्थिती या दोहोंच्या कचाट्यात सापडलेली ती स्त्री आहे. ती ना बंड करून उन्मुक्त व स्वैर होऊ पाहते. ती संस्काराच्या जंजाळात असते. परंपरेने घालून दिलेले दंडक आणि तिच्या मनाला भुलवणारा बंडखोरीचा भुलभुलैया या दोहोंत तिची घुसमट होते, या घुसमटीचे दर्शन ही कविता अगदीच संयमित शब्दांत आणि सूचकतेने करते. रेखा मिरजकर गेल्या कित्येक दशकांपासून लेखन करीत आहेत. तरी त्यांच्या मूळच्या स्वभावानुसार त्या शांत वृत्तीच्या असल्याने त्यांच्या कवितेत ती वृत्ती ओतप्रोत भरलेली दिसते. प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (९०११०८२२९९) ताळगाव, गोवा

Saturday, April 25, 2020

गझल कुणी कुणाला येथे पुस्तके ख्यालि खुशाली अभिमानाने सांगत सुटते ख्यालि खुशाली जाणून घ्यावे मर्म दिलाचे तगमग होता मौन प्रियेचे लाजून वदते ख्यालि खुशाली नजरेमध्ये भाव दाटले किती अनामिक प्रेमाची ती कबुली कथते ख्यालि खुशाली दु:खांदा या मिळते वाट मोकळी अश्रूंमध्ये तिथेच त्याची सुखास कळते ख्यालि खुशाली हात हलवुनि निरोप घेतो मी प्रेमाने विरहाची मग तिथे स्फुंदते ख्यालि खुशाली #. सागर प्रकाश

गझल

गझल कुणी कुणाला येथे पुसते ख्यालि खुशाली अभिमानाने सांगत सुटते ख्यालि खुशाली जाणून घ्यावे मर्म दिलाचे तगमग होता मौन प्रियेचे लाजून वदते ख्यालि खुशाली नजरेमध्ये भाव दाटले किती अनामिक प्रेमाची ती कबुली कथते ख्यालि खुशाली दु:खांदा या मिळते वाट मोकळी अश्रूंमध्ये तिथेच त्याची सुखास कळते ख्यालि खुशाली हात हलवुनि निरोप घेतो मी प्रेमाने विरहाची मग तिथे स्फुंदते ख्यालि खुशाली #. सागर प्रकाश