Sunday, April 27, 2008

सौ. चित्रा क्षीरसागर यांच्या कविता

सासुरवासीण
लेक चालली सासरी
उभी राहे दारी
विवाहाचे तप झाले
दाटतेच उरी
डोळे पुसते का?
त्या विरहाच्या
यातानाऊरी
भावनांचा पूर
पाठवणी करताना
बाप घरामध्ये माझा
डोळे टिपतो लपून
कष्ट केले संसारात
जपतो अजून
खंतावते कधी पोर
दूर किती राहे
हात सदा पाठीवर फिराताहे

दिंड्या
पंढरीच्या वाटेवर
दिंड्या चालल्या कितिक
वारकरी भजनात
झाडे झेलतात दुःख
बाभळीची झाडे वेडी
सडा फुलांचा घालती
वाटे पिवळी धमक
पायघडी अंथरती
देण्या सावली भक्तांना
बाभळही पुढे सरे
गच्च पानांच्या फांद्यांत
कडुनिंब छत्री

-- सौ. चित्रा क्षीरसागर

अंकुर साहित्य पुरस्कार

प्रकाश क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे' कवितासंग्रहाला
अंकुर साहित्य पुरस्कार
पणजी, ता. 27 ः अकोला येथील "अंकुर साहित्य संघा'तर्फे देण्यात येणारा 2007 चा "कवी बी पुरस्कार' (महाराष्ट्र वगळून) दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील आहेत. अंकुर साहित्य संघातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात येतात. संघातर्फे 10 व 11 मे रोजी चाळीसगाव येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. श्री. क्षीरसागर यांचा या आधी "गर्भावल्या संध्याकाळी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला असून महाराष्ट्रातील विविध साहित्यविषयक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटनेचा वेणेगुरकर स्मृती पुरस्कारही त्यांना यापूर्वी मिळाला आहे. तसेच संवाद नाशिक व गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीचे कविता व कथालेखनाची पारितोषिके व मराठी विज्ञान परिषदेचा विज्ञानरंजन कथेचे पारितोषिक मिळाले आहे. ते गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी कार्यकारिणी सदस्य, ताळगाव मराठी संस्कार केंद्राचे उपाध्यक्ष, कविकुल साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत.