Tuesday, March 25, 2008

बालकथा --- दुष्टाचा अंत

बालकथा
1)
दुष्टाचा अंत

एका गावाबाहेर घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक भला मोठा तलाव होता. त्या तलावात अनेक जलचर राहत होते. त्याचप्रमाणे काठावर असलेल्या झाडांवर माकडं, वानरं, खारी असले प्राणी राहत. ससे, हरिण, वाघ असे प्राणी होतेचे. सगळे आपापल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने राहात होते.
त्या तळ्यात एक मगर राहायची. ती स्वभावाने खूप दुष्ट होती. त्या मगरीचे वागणे कुणालाच आवडत नसे. ती कुणाशी मैत्री करीत नव्हती. तिचे नेहमी सगळ्यांशी खटके उडत. त्या जंगलातील झाडावर चिंटू नावाचा माकड राहात होता. त्याचा स्वभाव मगरीच्या अगदी उलट. अगदी प्रेमळ, मनमिळावू. सगळ्यांशी त्याची गट्टी जमे. तो हुशाही होता. मगरीचे वागणे त्याला आवडत नसे. तो तिला परोपरीने समजून सांगत असे. अग बाई असे दुष्टपणान वागू नको, त्याचा परिणाम भलताच होईल. पण तिच्या कानी कपाळी ओरडून काय फायदा, तिला त्याचे म्हणणे कधी पटतच नसे. ती सांगून ऐकत नसे.
त्याला नेहमी वाटायचे तिने चांगले वागावे. पण नाही. उलट ती त्यालाच सतावत असे. एकदा त्याला वाटले की तिला चांगला धडा शिकवायला पाहिजे. काय करावे, असा विचार तो करू लागला. विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली.
एके दिवशी काय झाले. चिंटू झाडावर उड्या मारत खेळत होता. तेवढ्यात मगर तळ्याच्या काठावर आली. त्याला म्हणाली, ""चिंटू चिंटू मी येऊ का तुझ्याबरोबर खेळायला.'' तिच्या डोळ्यातील कावा त्याला समजला. चिंटू सावध होताच. तो म्हणाला, ""ये की कोण नको म्हणतंय.'' त्याचा होकार मिळताच तिने विचारले काय खेळायचे? त्यावर चिंटू म्हणाला, ""आपण लपाछपी खेळू या.'' असं करता करता मगरीवर राज्य आलं. तेव्हा तिने विचार केला, त्याला शोधून काढण्याच्या बहाण्याने त्याला आपण मारून खाऊ शकू. ती त्याला शोधायला निघाली. पण चिंटू हुशार तो झाडावर जाऊन लपला. तिने खूप हुडकूनही तो तिला दिसेना. तेव्हा हार मानून तिने त्याला हाक मारली. पण चिंटूने ओऽऽ दिलीच नाही. तो आपला आंबे खात बसला होता वर. तिने त्याला पाहून न पाहिल्यासारखे केले. आता तिने थकून जाऊन बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. कारण तिला चिंटूला खायचे होते. आपण बेशुद्ध पडल्याचे पाहून तरी तो खाली येईल, अशी तिला खात्री होती. चिंटूला वाटले, की मगर खरोखर बेशुद्ध पडली आहे. तो खाली येऊ लागला. तेवढ्यात मगरीने डोळे किलकिले
केले ते त्याच्या लक्षात आले. आपल्याला खाऊन टाकण्याचा तिचा डाव आहे, हे त्याच्या ध्यानात आले. तो परत वर गेला व दुसऱ्या झाडावर जाऊन तिच्या पाठीमागून खाली उतरला. तिच्या ते लक्षात आलेच नाही. तिला वाटले तो खाली येत आहेच. पण चिंटून खाली जाऊन चांगले दहा बारा मोठे धोंडे आणले. चिंटू येत नाही हे पाहून मगर कंटाळली आता ती उठली व निघाली तडातडा झाडाकडे. तेवढ्यात चिंटूने एका मागून एक मोठमोठे धोंडे नेम धरून तिच्या अंगावर फेकले. वरून दगड पडल्याने तिच्या डोक्‍याला मार लागला. खूप जोरात लागल्याने मगर मरून गेली. दुष्ट मगर मेल्यामुळे सगळ्या जंगलाचे संकट दूर झाले. सर्वांनी चिंटूचे आभार मानले.
काय दोस्तांनो आवडली ना माझी गोष्ट!

माधव प्रकाश क्षीरसागर,
इयत्ता सहावी
मुष्टीफंड महालक्ष्मी विद्यालय, पणजी

1 comment:

prakashkshirsagar said...

katha manavi manache khel dakhavate nahi ke?